कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Wednesday, February 8, 2012

प्रेम मरणातूनही उरे...!

एक होते आटपाट नगर
त्यात होता देखणा चिमणा
सातासमुद्रापलीकडे जायचेच
हा असे त्याचा बाणा...

होता तो हुशार मोठा
अढळ होता त्याचा निर्धार
केली त्याने दरमजल
पोहोचला सातासमुद्रापार

स्वर्ग उरला दोन बोटे
सरू लागला सुखद काळ
तिथेही त्याने कीर्ती मिळवली
सोडला न कधी ताळ

एके दिवशी अजब घडले
चिमणा प्रेमात पडला
निसर्गाची जादूच न्यारी
त्याने सांगावा धाडला..

परदेशी पडू नये प्रेमात
साधा नियम तो विसरला
प्रेम होईल का सफ़ल??
विचारही नाही मनास शिवला..

चिमणी होती साधी मोठी
प्रेमातील भेद तिला न ज्ञात
चिमणा रंगून सांगी तिला
काय आहे आटपाट नगरात...

एक दिवस असा उजाडला
परतण्याची वेळ आली
मी ही येणार संगतीने
चिमणी हट्ट धरून बसली

तिचे मन मोडवेना
मायदेशाची आठवण सोडवेना
तो म्हणाला,"बरं चल..!"
तिचा आनंद गगनात मावेना...

निघाले दोघे जोडीने
अंतर पडले धावणीला
समोर अथांग सागर
चिमणीला प्रवास सोसवेना

नाजूक साजूक कुडी तिची
पार थकून गळून गेली
"थांब की रे...किती वेगाने??"
म्हणून चिमण्याला थांबवू पाही..

नाजूक माझी राणी ती
म्हणत चिमणाही थांबला
दूरवर पाहून जहाज एक
त्यावर थांबायचे विचार ठरला

जहाजापर्यंतची अंतरही
चिमणीकडून संपता संपेना
खुरडत खुरडत कण्हत शेवटी
चिमणीचा पाय जहाजाला टेकला..

इथेच थांबू काही दिवस
घे जरा विश्रांती राणी..
गोंजारत त्याने चिमणीची
धाप जरा सुमारली

पण थकवा काही हटेना
चिमणी खंगत चालली
हवा तिला सोसवेना
ती झुरत चालली...

तू निघून जा पुढे
चिमणी सांगे चिमण्याला
चिमणा म्हणे,"जाऊ तर एकत्रच.."
तुझ्याशिवाय काय अर्थ जगण्याला?

दिवसामागून दिवस गेले
चिमणा चिमणी खंगत चालले
एके दिवशी जहाजावरच्यांना
त्या दोघांचे मृतदेहच सापडले..

प्रयत्न करूनही दोघांना
वेगळे करता आले नाही..
मेल्यावरही जणू दोघांनी
एकमेकांची साथ सोडली नाही

त्या दोघांचे काय करायचे..?
दिले समुद्रात फ़ेकून
समुद्रतळाशी घेताएत
चिरशांती दोघे मिळून

कळली असती प्रेमकथा त्यांची
तर गहिवरले असते सारे
समाधी बांधली असती सुंदर त्यांची
म्हणत.."प्रेम मरणातूनही उरे...!"

No comments: