भगवान गौतम बुद्ध उपदेश देण्याकरिता आनंदसोबत एका गावाला चालले होते. रस्त्यात
त्यांनी एक छोटी नदी ओलांडली आणि पुढे गेले. कडकडीत ऊन पडले होते आणि दिवस खूप
गरम होता. थोड्या वेळानंतर भगवान बुद्ध यांना तहान लागली. ते एका वृक्षाखाली
विसावले आणि आनंदला थोड्या वेळापूर्वी ओलांडलेल्या नदीतून पाणी आणायला
सांगितले. तो नदीपर्यंत पोहोचला. त्याने पाहिले की पाणी गढूळ आहे आणि
पिण्यायोग्य नाही. तो परत आला आणि बुद्धांना सांगितले की, पाणी स्वच्छ नाही.
मग भगवान म्हणाले, परत जा आणि पाणी स्वच्छ होईपर्यंत प्रतीक्षा कर.
आनंद परत गेला. तोपर्यंत काही माती खाली तळाला गेली होती. पण, पाणी अजून
अस्वच्छच होते. काही करण्यासाठी नव्हते म्हणून आनंद नदीकाठी ध्यानात बसला.
थोड्या वेळानंतर त्याने डोळे उघडले तर काय बघतो की पाणी अगदी स्वच्छ झालेले
होते. माती पूर्णपणे खाली तळाला गेली होती. आमच्या मनाचेही तसेच आहे. जशी माती
पाण्याला घाण करते तसेच आमचे विचार आमच्या चेतनेला गढूळ करतात. ज्या क्षणी
आम्ही विचारांकडे लक्ष देत नाही, त्यांना महत्त्व देत नाही, आमच्या अंतर्मनात
मौन उतरायला लागते. आम्हाला चेतनेची शुद्ध स्थिती प्राप्त होते. यालाच ध्यान
म्हणतात.






No comments:
Post a Comment