आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
माणसांमध्ये जाऊन बसायचं, छान छान बोलायचं, खोटं खोटं हसायचं
... आणि अजून माणसात आहे असं दाखवायचं...
आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
त्या चंद्राशी गप्पा मारण्यापेक्षा मित्रांबरोबर कट्ट्यावर बसायचं
माझं सोडून त्यांचं रडगाणं ऐकायचं.. सूर कुठे जुळतात का ते पहायचं...
आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
मनात आभाळ दाटून आले की बाहेर पडणाऱ्या पावसात भिजायचं
मग ह्या शरीराबरोबर मनालाही गारवा मिळतो का ते पहायचं...
आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
हळवं बिळवं व्हायचं नाही..रुतलेल्या काट्यांना मलमपट्टी करायची..
दारू पेक्षा दवा काही काम करते का ते पहायचं...
आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
खोलीत जाऊन दार घट्ट बंद करून घ्यायचं..खिडक्या बंद करून पडदे ओढून मिट्ट अंधार करायचा..
पोटात पाय घेऊन मनसोक्त रडायचं आणि खरंच मन मोकळं होतं का ते पहायचं...
आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
No comments:
Post a Comment