कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Thursday, August 9, 2012

ईरशाळ (किल्ला)


ईरशाळ
किल्ल्याची ऊंची : 3700
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: माथेरान
जिल्हा : रायगड
श्रेणी : मध्यम
ईरशाळगड हा कर्जत विभागात येणारा किल्ला आहे.गडावरील विशाळादेवीच्या नावाचा अपभ्रंश होऊन या गडाचे नाव ईरशाळगड झाले असावे. कर्जत, मलंगगड, प्रबळगड हे सर्व कोकणात येणारे किल्ले आहेत. कल्याण - पुणे लोहमार्गावरून जातांना मलंगगड, देवणीचा सुळका, माथेरान, पेब, म्हैसमाळ, प्रबळगड, ईरशाळगड हा परिसर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. या परिसरातील जनजीवन तसे सर्वसामान्यच आहे पावसाचे प्रमाण मुबलक असल्यामुळे सर्वत्र भाताची शेती फार मोठ्या प्रमाणावर होते. महामार्गापासून गड जवळच असल्याने पायथ्याच्या गावापर्यंत वाहनाने जाण्याची सोय होते.


इतिहास : ईरशाळला गड म्हणणे अयोग्य आहे, कारण ईरशाळ हा एक सुळका आहे. त्यामुळे इतिहासात त्याचा कुठे उल्लेख नाही.गडावरील पाण्याच्या टाक्यांचे अत्सित्व पाहाता याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला असावा असे वाटते. मे १६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी रायरी पर्यंतचा सारा मुलूख घेतला तेव्हा हा गडदेखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. ईरशाळ म्हणजे प्रबळगडचा सख्खा शेजारी. २३ जानेवारी १९७२ रोजी याच सुळक्यावर एक दु:खद घटना घडली ती म्हणजे, कुमार प्रकाश दुर्वे याचा किल्ल्यावरून पडून दु:खद अंत झाला. त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारीला मुंबई - ठाण्याचे गिर्यारोहक येथे जमतात.
पहाण्याची ठिकाणे :ईरशाळगड म्हणजे एक सुळकाच आहे. ईरशाळ माची पासून गडावर जातांना, वाटेतच पाण्याचे एक टाकं लागत तेथून पुढे सोपे असे प्रस्तरारोहण करून आपण गडाच्या नेढ्यात पोहोचतो. सध्या येथे शिडी बसविल्यामुळे प्रस्तरारोहण न करता सुध्दा नेढ्यापर्यंत जाता येते.शिडी चढण्यापूर्वी डावीकडे विशाळा देवीची मूर्ती पाहायला मिळते. नेढ्यापासून थोडे वर गेल्यावर, डावीकडे पाण्याचे एक टाकं लागत व बाजूलाच एक कपार आहे. हे पाणी पिण्यास योग्य आहे, नेढ्यातून समोर चढणारी वाट सुळक्यावर जाते. सुळक्यावर जाण्यासाठी प्रस्तारारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यकच आहे. गडमाथ्यावरून समोरच प्रबळगड, माथेरान, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा : मुंबईहून रेल्वेने खोपोली गाठावी. खोपोलीहून एस.टी. किंवा ६ आसनी रिक्षाने २० कि.मी.वरील चौक गाठावे. चौकहून ईरशाळगडाचा पायथा गाठण्यास अर्धा तास लागतो. पायथ्या पासून ईरशाळवाडी मार्गे गडमाथा गाठण्यास दिड तास लागतो.
राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. पण ईरशाळवाडीतील शाळेत राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय : किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय : मार्च पर्यंत गडावरील टाक्यात पाणी असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ : ईरशाळवाडीतून एक तास लागतो.जाण्यासाठी उत्तम कालावधी : पावसाळा सोडून इतर सर्व ऋतुत गडावर जाता येते.
सूचना : गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. १०० फूटी रोप व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे.
पावसाळा सोडून इतर वेळी गडावर जाण्यास हरकत नाही.

No comments: