जीवनाच्या नाजूक वळणावर
भावनांचा प्रत्यय येतो
प्रत्येकाच्या आयुष्यात
प्रेमाच्या इंद्रधनुचा उदय होतो......
प्रेम म्हणजे
भावनेच्या आकाशात मारलेली
उत्तुंग भरारी असते,
स्वताच्या नकळतच
ह्रदय फरारी असते....
प्रेमात हवी असते एक नजर-भेट
स्वप्नांचे झोके झुलण्यासाठी,
आणि अवचितच स्मित हास्य
अक्षतांचे चांदणे झेलण्यासाठी .....
प्रेम म्हणजे
हृदयाचे वाढणारे ठोके,
प्रेम म्हणजे
रात्री झुलणारे स्वप्नांचे झोके.....
प्रेम हे भावनांचे असे आकाश आहे
ज्याला कुठेच अंत नाही,
प्राण गेला...तरी त्याची मनाला खंत नाही....
प्रेम हि भावनांची ठिणगी आहे
जी हृदयात पेट घेते,
जीवनाच्या त्या वळणावर
अविस्मरणीय आठवणींची भेट देते....
प्रेम हे कधीच कुणाला चुकले नाही
असे एकही हृदय नाही
ज्यात प्रेमाचे चांदणे
लुकलुकले नाही....
प्रेमात संभाषणाचा भार
डोळे पेलत असतात,
ओठ जरी स्थिर राहिले
डोळे मात्र बोलत असतात....
प्रेम ह्या दोन शब्दातच
जीवनाचा खरा अर्थ दडला आहे,
तो अर्थ शोधण्यासाठीच तर
एक जीव दुसऱ्यावर जडला आहे.....
प्रेम हा शब्द उच्चारताना
मनाला हर्ष होतो,
दोन ओठांचाही
एकमेकाना स्पर्श होतो....
खरे प्रेम एकदाच होते
जे कधी विसरता येत नाही,
सुंदर हळव्या भावनांचे आकाश
अनेकांवर पसरता येत नाही........
No comments:
Post a Comment