वारा तसा पुराना
गातोच गीत काही
पण नकळत छेडणारा
पाऊस येत नाही
झाली उजाड राने
कोरड्या दिशा दाही
मनसोक्त चिंबवणारा
तरी पाऊस येत नाही
जमतात मेघ हल्ली
उडे दूर पाचोळाही
पण चैतन्य पेरणारा
पाऊस येत नाही
सुकलेत स्त्रोत सारे
भेगाळली भूईही
पण डोळ्यात दाटलेला
पाऊस येत नाही
हंबरे गाय तानी
होते अंग लाही लाही
तरी रानात हरवलेला
पाऊस येत नाही
शब्दात गोठलेली
भिजते वही कधीही
पण मिठीत गवसलेला
पाऊस येत नाही
गेल्या दिंड्या पताके
दुमदुमली पांढरीही
पण भजनात दंगलेला
पाऊस येत नाही
कढ दाटतात आता
जुने आठवतेच काही
गेल्या हस्तात हरवलेला
तरी पाऊस येत नाही
सांजावता दिव्यांना
फुंकतात द्वाड भोई
पण अंधारात गुडुप्पलेला
पाऊस येत नाही
No comments:
Post a Comment